निंबूतची लेक झाली डॉक्टर! वैष्णवी बनसोडेचे B.P.Th परीक्षेत सुयश; संपूर्ण तालुक्यात कौतुक
सोमेश्वरनगर: निंबूत (ता. बारामती) येथील कु. वैष्णवी ताईबाई रमेश बनसोडे हिने वैद्यकीय क्षेत्रातील B.P.Th (Bachelor of Physiotherapy) ही पदवी यशस्वीरित्या मिळवून गावाची मान अभिमानाने उंचावली आहे. वैष्णवीच्या या यशाने संपूर्ण निंबूत परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैष्णवीने अत्यंत प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर मात करत, केवळ जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशात तिची आई ताईबाई यांची प्रेरणा आणि वडील रमेश आण्णा यांचे मोलाचे योगदान आहे. वडिलांनी आजारपणावर मात करत आणि मुलीच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करून तिला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे स्वप्न पूर्ण केले.
आदर्श मिलिंद तरुण मंडळाकडून गौरव
वैष्णवीच्या यशाचे कौतुक करण्यासाठी आदर्श मिलिंद तरुण मंडळ, निंबूत यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक व विचारवंत संभाजी गायकवाड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाला वीर योद्धा प्रतिष्ठानचे बापूसाहेब ढावरे, निवृत्त PSI हुंबरे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, चंदू दादा बनसोडे, अशोक बनसोडे, प्रसाद सोनवणे यांसह गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भीमराव बनसोडे यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन अमोल बनसोडे यांनी केले.
"जिद्द, परिश्रम आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते" — वैष्णवी बनसोडेचा हा प्रवास ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी वाचत रहा:
वीर योद्धा न्यूज एक्सप्रेस
