पाडेगाव (ता. फलटण) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्रामीण लेखक, कवी आणि कायदेअभ्यासक डॉ. प्रविण जोशी यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल वीर योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
डॉ. जोशी यांनी “प्रबोधन कालखंडाचा मराठी साहित्यावरील प्रभाव : कालखंड 1800 ते 1950” या विषयावर प्रदीर्घ संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रतिष्ठानने विशेष सत्कार आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब ढावरे, अमोल बनसोडे, दादासाहेब अवघडे, अनिकेत कांबळे, विजय भंडलकर, सचिन पाटोळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापूसाहेब ढावरे म्हणाले, “डॉ. जोशी यांचे संशोधन पाडेगावचे नाव उंचावणारे आहे. शिक्षक म्हणून त्यांचे कार्य प्रभावी असून त्यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन केले आहे. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा असा व्यक्ती निश्चितच प्रेरणादायी आहे.”
तसेच अमोल बनसोडे यांनी सांगितले की, “दिडशे वर्षांच्या साहित्याचा अभ्यास करणे सोपे नाही. या विषयावरील हे पहिलेच संशोधन असल्याने ते अत्यंत मौलिक असून प्रबोधनाचा विस्तार या संशोधनातून झाला आहे. अनेक गैरसमज दूर करण्यात या कार्याचा मोठा वाटा आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी सचिन पाटोळे यांनी आभार मानले.
अभ्यासक्रमात समावेशाची मागणी
डॉ. जोशी यांच्या साहित्यात प्रबोधन मूल्ये ठळकपणे दिसून येतात. त्यांच्या कवितांमध्ये दर्जा असून नव्या बोलीचा अनुभव वाचकांना मिळतो. त्यांच्या साहित्याचे कौतुक डॉ. श्रीपाल सबणीस आणि उषाकिरण आत्राम यांसारख्या नामवंत साहित्यिकांनी केले आहे.
त्यामुळे त्यांचे साहित्य विद्यापीठ व माध्यमिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी वीर योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे बापूसाहेब ढावरे यांनी सांगितले.