Hot Posts

6/recent/ticker-posts

सुकलवाडीत 'अभिमान महिला प्रभाग संघा'चा वर्धापन दिन उत्साहात; १ कोटी ५० लाखांचे अर्थसाहाय्य आणि महिलांचा गौरव

सुकलवाडी (ता. पुरंदर):

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद गटांतर्गत कार्यरत असलेल्या 'अभिमान महिला प्रभाग संघा'ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २४ मार्च २०२६ रोजी सुकलवाडी येथील श्री दत्त मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर भर देत विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

महिलांना स्वयंरोजगाराचे बळ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महिलांना कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित महिलांना कार्यक्रमात प्रमाणपत्रे आणि मोफत गावरान कोंबड्यांची पिल्ले वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम आणि उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून मोठी मदत

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रने सुकलवाडी येथील बचत गटांसाठी तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. ही मोठी आर्थिक मदत महिलांच्या उद्योजकीय वाटचालीला नवीन दिशा देणारी ठरणार आहे.

यशस्वी महिला व संस्थांचा सन्मान

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसंघांचा, ग्रामसखींचा तसेच बचत गटातील यशस्वी उद्योजिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला सभापती मा. अमितदादा झेंडे आणि जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्राजक्ताताई दुर्गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपसभापती प्रवीण जगताप, पंचायत समिती सदस्या स्मिताताई निगडे, मोनिका कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात, सरपंच संदेश पवार, उपसरपंच उर्मिलाताई पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

​कार्यक्रमाचे संयोजन तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कुर्डे, गणेश किकले आणि त्यांच्या टीमने केले होते